इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इंदूरमधील योगा केंद्रात निवृत्त सैनिक बलविंदर सिंग छाबरा यांचे शुक्रवारी ‘माँ तुझे सलाम..’या देशभक्तीपर गीतावर सादरीकरण करताना निधन झाले. नाचताना ते स्टेजवर पडले. त्या वेळी त्यांच्या हातात तिरंगा होता. लोकांनी ते परफॉर्म करत असल्याचे समजून टाळ्या वाजवल्या; परंतु ते बेशुद्ध पडले होते. गाणे संपल्यावर लोक त्यांच्याकडे आले. त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात आला. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
फुटी कोठी येथील अग्रसेन धाम येथे आस्था योगा क्रांती अभियानातर्फे मोफत योग शिबीर भरवण्यात आले होते. त्या वेळी छाबरा स्टेजवर तिरंगा घेऊन एका गाण्यावर परफॉर्म करत होते. स्टेजवरून खाली येत त्यांनी प्रेक्षकांतही परफॉर्म केले. त्यानंतर ते पुन्हा स्टेजवर चढले आणि अचानक खाली कोसळले. काही सेकंद ते तसेच बेशुद्ध पडले. लोकांना वाटले, की हा परफॉर्मचा भाग आहे.
डोळे आणि त्वचा दान
छाबरा यांचे २००८ मध्ये बायपास झाले होते. छाबरा यांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले, तेव्हा त्यांच्या मोबाइलवरून त्यांनी अवयवदानाचा फॉर्म भरल्याचे निदर्शनास आले. याबाबत कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर त्यांचे डोळे आणि त्वचा मुस्कान ग्रुपच्या माध्यमातून दान करण्यात आली.