इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यात कोंढावळे खुर्दमध्ये जमिनीच्या वादातून २१ वर्षीय तरुणीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. प्रणाली बबन खोपडे असे या तरुणीचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या वेळी मुंबईतील शिवडी येथील कुख्यात गुंड उमेश रमेश जयस्वाल उर्फ राजू भैय्या उपस्थित होता. त्याने दहशत निर्माण करून जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्याने तरुणीला गाडण्याचा प्रयत्न केला. अन्य महिलांना धमकी दिली. घटनेनंतर मुली आई कमल यांनी सांगितले, की मी व माझ्या दोन मुली प्रणाली व प्राजक्ता शेतात काम करत असताना एकाने पंधरा ते सोळा गुंड पाठवले.
ही जमीन आमच्या नावावर झाली आहे, असे सांगत पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. प्रणालीने विरोध केल्यानंतर तिला जेसीबीने ढकलून तिच्यावर माती टाकण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आईने दुसरी मुलगी प्राजक्ताच्या साह्याने तिच्या अंगावरील माती बाजूला काढून तिला वाचवले.