नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या महसूल आयुक्त पदाचा कार्यभार राधाकृष्ण गमे यांच्याकडून डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वीकारला. श्री. गमे हे आज सेवानिवृत्त झाल्याने शासनाने गेडाम यांची नियुक्ती केली. डॉ .गेडाम यांनी यापूर्वी नाशिक महापालिका आयुक्त म्हणून काम केलेले असून डॉ. गेडाम सध्या कृषी आयुक्त म्हणून कार्यरत होते.
डॉ. गेडाम हे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. राज्यभरात गाजलेला जळगावचा घरकुल घोटाळा त्यांनी बाहेर काढला. याच प्रकरणी माजी आमदार सुरेश जैन आणि अन्य नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तसेच, डॉ. गेडाम यांनी नाशिक महापालिका आयुक्त पदासह विविध शहरांमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
त्यांच्या सर्वोत्तम कारभाराची दखल घेत मोदी सरकारने त्यांना केंद्रात बोलवून घेतले. केंद्राच्या महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली. तेथेही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यानंतर त्यांनी परदेशात जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांना राज्याचे कृषी आय़ुक्त आणि आता नाशिकचे विभागीय आयुक्त ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.