नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -शासकीय सेवेत ३७ वर्षे काम केले. इतक्या वर्षांची सेवा बजावून आज सेवेतून समाधानाने निवृत्त होत आहे. या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत असताना समाजाच्या विकासासाठी अनेक विविध उपाययोजना राबविल्या. त्याचा समाजाला उपयोग झाला. आज सेवेतून निवृत्त झालो तरी सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायचे असतील तर त्यासाठी लागणारे मार्गदर्शन व मदत करण्यास मी सदैव उपलब्ध आहे, अशी भावना आज सेवानिवृत्ती होणारे नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केली.
जलवैभव सभागृह, महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था, नाशिक (मित्रा) येथे आयोजित सेवापूर्ती गौरव सोहळ्यात सेवानिवृत्त होणारे विभागीय आयुक्त श्री. गमे बोलत होते. यावेळी नवनियुक्त विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, भारती गमे आदी उपस्थित होते.
नाशिक विभागातील नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल, नंदुरबार जिल्हाधिकारी मनिषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प) नाशिक आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प) अहमदनगर आशिष येरेकर, अपर आयुक्त नीलेश सागर,विभागातील उपायुक्त, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी विभागीय आयुक्तांना निरोप दिला.
विभागीय आयुक्त श्री गमे म्हणाले की, गेली ३७ वर्ष प्रशासनातील कामकाजाचा अनुभव पाहता पूर्वीच्या परिस्थितीत व आत्ताच्या परिस्थितीत कमालीचा बदल झाला आहे. आताच्या संगणकीयप्रणालीद्वारे बरीच कामे तात्काळ निकाली निघतात. तसेच संवाद प्रणालीत झालेल्या बदलांमुळे प्रशासकीय कामकाज देखील सुलभ होण्यास मदत होत आहे. आज माझ्या सेवानिवृत्त कार्यक्रमात व्यक्त केलेले माझ्याविषयीचे प्रेम ही माझ्यासाठी प्रेमाची शिदोरी असून, पुढील आयुष्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना, श्री. गमे यांनी व्यक्त केली.
कामाचा व खासगी आयुष्याचा समतोल साधणारा अधिकारी:-नवनियुक्त विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम*
प्रशासनात काम करत असताना काम व वैयक्तिक आयुष्य याचा समतोल राखू शकत नाही. परंतु गमे साहेबांनी कामाचा व खासगी आयुष्याचा समतोल राखून एक आदर्श निर्माण केला आहे, असे मत नवनियुक्त विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी व्यक्त केले.
महसूल मधील ऋषितुल्य व्यक्ती:- सिद्धाराम सालीमठ
समाजातील लोकांसाठी सद्भावनेने काम करावे अशी शिकवण देणारे श्री गमे साहेब महसूलमधील ऋषितुल्य व्यक्तिमत्व असल्याचे मत, अहमदनगरचे जिल्हाधिकारी तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धराम सालीमठ यांनी व्यक्त केले. तसेच कुठल्याही कामाला सकारात्मक पद्धतीने घेऊन सदर काम मार्गी लावण्याचा त्यांचा हातखंडा असल्याचे मत श्री. सालीमठ यांनी व्यक्त केले.
राधाकृष्ण गमे व्यक्ती नसून संस्थात्मक स्वरूप: कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे
राधाकृष्ण गमे यांनी नेटवर्किंगच्या माध्यमातून महसुली सेवा हातावर आणून ठेवली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या सेवेच्या कालावधीत कुपोषणग्रस्त बालकांसाठी विविध योजना राबविल्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी उभारी योजना राबवून त्यांच्यातील संवेदनशील अधिकाऱ्यांचे दर्शन घडवून आणले आहे. त्यामुळे राधाकृष्ण गमे हे केवळ एक व्यक्ती नसून संस्थात्मक स्वरूप असल्याचे मत, महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.संजीव सोनवणे यांनी व्यक्त केले. तसेच श्री. गमे यांनी राबविलेल्या योजनांवरती संशोधन करण्याबाबतचा अभ्यासक्रम मुक्त विद्यापीठामार्फत राबवण्याबाबत विचार केला जाईल, असेही श्री सोनवणे यांनी सांगितले. श्री गमे यांची कारकीर्द अभिमान वाटावी अशी असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रा. सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी श्री. गमे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी उपायुक्त मच्छिंद्र भांगे, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, सुहास मापारी, अव्वल कारकून अरुण सुकते यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर आयुक्त नीलेश सागर यांनी व्यक्त केले तर आभार उपायुक्त राणी ताटे यांनी मानले. कार्यक्रमात श्री गमे यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली.