नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात तोतया पोलीसांचा सुळसुळाट झाला असून वयोवृध्दांना गाठून ही टोळी अंगावरील किमती दागिणे लांबवित असल्याचे बोलले जात आहे. गुरूवारी (दि.३०) चार्वाक चौक आणि कामटवाडा भागात पोलीस असल्याची बतावणी करीत या टोळीतील सदस्यांनी अवघ्या काही मिनीटात दोन वृध्दांच्या गळयातील लॉकीट आणि हातातील सोन्याची अंगठ्या सुरक्षीत ठेवण्याच्या बहाण्याने हातचलाखीने लांबविल्या. याप्रकरणी अंबड व इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत माणिक दगडू पगारे (७६ रा.वृंदावननगर,कामटवाडे) व सुभाष नारायण उपासणी (८३ रा.गणराज कॉलनी,इंदिरानगर) यांनी फिर्याद दाखल केल्या आहेत. पगारे गुरूवारी सकाळी दहाच्या सुमारास कामटवाडे येथील मयुर हॉस्पिटल समोरून रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. इंद्रायणी मेडिकल स्टोअर्स परिसरात दोघांनी त्यांना गाठले. पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी पुढे खून झाल्याचे सांगितले. यावेळी पगारे यांना अंगावरील सोन्याचे दागिणे सांभाळण्याच्या सल्ला देवून संशयितांनी गळयातील सोन्याचे लॉकिट व अंगठी रूमालात बांधून देण्याचा बहाणा करून हातचलाखीने सुमारे ६० हजार रूपये किमतीचे अलंकार लांबविले. पगारे यांनी घरी जावून रूमाल उघडून बघितला असता फसवणुकीचा प्रकार समोर आला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक घुनावत करीत आहेत.
या घटनेनंतर अवघ्या ४५ मिटीनात दुसरी घटना इंदिरानगर परिसरातील चार्वाक चौकात घडली. गणराज कॉलनीत राहणारे उपासणी सकाळी १०.४५ सुमारास चार्वाक चौकातील शास्त्रीनगर नजीकच्या संकेत बंगल्या समोरून रस्त्याने पायी जात असताना भामट्यांनी त्यांची वाट अडविली. यावेळी पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी वरिलप्रमाणे उपासणी यांनाही गंडा घातला. या घटनेत मदतीचा बहाणा करून भामट्यांनी सोनसाखळी व अंगठी असा सुमारे ७० हजाराचा ऐवज हातोहात लांबविला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.