इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय निवडणूक आयोग उद्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानासाठी सज्ज आहे. बिहार, चंदीगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५७लोकसभा मतदारसंघात आज मतदान होणार आहे. याच्या सोबतीला, ओडिशा राज्य विधानसभेच्या उर्वरित ४२ विधानसभा मतदारसंघांसाठीही याच वेळी मतदान होणार आहे.
गेल्या महिन्याच्या १९ तारखेपासून सुरू झालेल्या या मतदान महाभियानाची उद्या सांगता होणार आहे. या महाभियानात या आधी ६ टप्प्यात ४८६ लोकसभा मतदारसंघातील मतदान पूर्ण झाले आहे. २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ४८६ लोकसभा मतदारसंघातील मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडले आहे.४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
मतदान यंत्रे आणि मतदान साहित्यासह मतदान अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत. मतदान सुखकर आणि सुरक्षित वातावरणात होईल याची खात्री करण्यासाठी पुरेशी सावली, पिण्याचे पाणी, रॅम्प आणि स्वच्छतागृहांसह सर्व मूलभूत सुविधांसह मतदारांचे स्वागत करण्यासाठी मतदान केंद्रे सज्ज आहेत. हवामान विभागाने ज्या भागांसाठी उष्ण हवामान किंवा पावसाचा अंदाज वर्तवला असेल अशा भागात, संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राज्य यंत्रणांनी प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उष्ण वातावरण असूनही, मतदारांनी मागील टप्प्यात मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर मोठी गर्दी केली होती. मागच्या दोन टप्प्यात, महिला मतदानाची टक्केवारी पुरुष मतदारांच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून आले आहे. मतदारांनी घराबाहेर पडून जबाबदारी समजून घेत, अभिमानाने तसेच अधिकाधिक संख्येने मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.