इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहिल्यादेवींचे योगदान पाहता यापुढे त्यांचा उल्लेख अहिल्या’बाई’ असा करण्याऐवजी अहिल्या’देवी’ असा करावा यासाठी शासन जीआर काढेल असे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले. धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असला तरीही धनगर समाजाला आदिवासी समाज बांधवांप्रमाणे सारे लाभ मिळतील, शिष्यवृत्ती, वसतीगृह अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
लोककल्याणकारी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर येथील चौंडी या त्यांच्या जन्मगावी भेट देऊन त्यांना विनम्र अभिवादन केले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हे मनोगत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा अर्ज भरून झाल्यावर तिथल्या घाटाला भेट दिली तिथे अहिल्यादेवींचा मोठा पुतळा आहे, मी त्यांच्यापुढे नतमस्तक झालो. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव संपूर्ण देशभरात मोठ्या अभिमानाने घेतले जाते. पुढच्या वर्षी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आहे. ही जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल.
यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री अतुल सावे, मंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार संजय शिरसाट, आमदार श्रीमती मोनिकताई राजळे, अण्णासाहेब डांगे, दत्तात्रय भरणे, सुरेश धस, राम शिंदे, गोपीचंद पडळकर तसेच विविध पक्षांचे मान्यवर पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व अहिल्यादेवींचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.