इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सातारा – गाडीचा वेग कमी ठेवणे, नियमांत गाडी चालवणे असे सांगून सर्वसामान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पोलिसांच्याच गाडीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यात घडलेल्या घटनेत तिघे गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे पोलिसांबद्दल प्रचंड रोष व्यक्त होत आहे.
कराड-ढेबेवाडी मार्गावर रविवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास चार तरुण रस्त्याच्या कडेला उभे राहून गप्पा मारत होते. त्याचवेळी कोळेवाडीकडून ढेबेवाडीकडे निघालेल्या भरधाव पोलीस गाडीने या तरुणांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर जखमी झाले. मृत तरुण कोळेवाडीचा तर जखमी तरुण कुसूर गावातील असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू होते. महामार्गांवरील अपघात रोखण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. वेगवान गाड्यांना रोखून त्यांच्यावर नियंत्रण आणणे आणि वेळीच कारवाई करण्याचे काम पोलिसांचे आहे. अशा परिस्थितीत पोलीसच बेजबाबदारपणे वागत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने कुणाकडे बघावे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ग्रामस्थ आक्रमक
सुजल कांबळे असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून इतर तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. गाडी चालवणाऱ्या पोलिसाने मद्यपान केले असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.