इंडिया दर्पण ऑनालाईन डेस्क
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता, नवी दिल्लीत भारत मंडपम इथे ‘संकल्प सप्ताह’ ह्या विशेष उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. ‘संकल्प सप्ताह’ हा आकांक्षी तालुका कार्यक्रमाच्या परिणामकारक अंमलबजावणीशी निगडीत आहे.
या देशव्यापी कार्यक्रमाची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७ जानेवारी २०२३ रोजी केली होती. नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी गट स्तरावरील कारभार सुधारणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. हा कार्यक्रम देशातल्या ३९९ जिल्ह्यांतील ५०० आकांक्षी गटांमध्ये राबविला जात आहे. आकांक्षी गट कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि परिणामकारक गटविकास योजना तयार करण्यासाठी देशभरात गाव आणि गट स्तरावर चिंतन शिबिरे आयोजित करण्यात आली होती.
देशातल्या सर्व ५०० आकांक्षी तालुक्यांमध्ये हा ‘संकल्प सप्ताह’ साजरा केला जाईल. ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ‘संकल्प सप्ताह’ मधील प्रत्येक दिवस एका विशिष्ट विकास विषयक संकल्पनेला समर्पित असेल, ज्यावर सर्व आकांक्षी तालुके काम करतील. पहिल्या सहा दिवसांच्या संकल्पनेमध्ये ‘संपूर्ण आरोग्य’, ‘सुपोषित कुटुंब’, ‘स्वच्छता’, ‘कृषी’, ‘शिक्षण’ आणि ‘समृद्धी दिवस’ या बाबींचा समावेश आहे. आठवड्याचा शेवटचा दिवस म्हणजे ९ ऑक्टोबर, २०२३ हा संपूर्ण आठवडाभर आयोजित केलेल्या कार्याचा ‘संकल्प सप्ताह – समावेश समारोह’ म्हणून साजरा केला जाईल.
या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला, देशाच्या कानाकोपऱ्यांतून भारत मंडपम येथे आलेले ग्रामपंचायत आणि तालुका स्तरावरील सुमारे तीन हजार लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत. त्याशिवाय, तालुका आणि पंचायत स्तरावरील पदाधिकारी, शेतकरी आणि इतर अनेक क्षेत्रातील लाखो लोक आभासी माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होतील.