कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मित्रांचे रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉ. अजय तावरे यांना भर चौकात फाशी द्या, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली. कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ससून रुग्णालयाचे डॉ. तावरे यांच्यावर टीका केली.
यावेळी ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यात काळिमा फासणाऱ्या घटना घडतात. उडता पंजाब सारखे पुणे म्हणण्याची वेळ आली आहे. पोलिस सुपाऱ्या घेऊन काम करतात, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. पुण्यातील अपघात प्रकरणात ससूनच्या लॅबमधील डॉक्टरांनी आरोपीचे रक्त फेकून देण्यापर्यंत मजल गेली. रक्ताच्या नमुन्यात फेरफार केला. यात डॅा. तावरे याचा मोठा हात असल्याचे त्यांनी सांगितले.
ललीत पाटील प्रकरणात मी हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, असे सांगून ते म्हणाले, की मी कुणाची माफी मागणारा कार्यकर्ता नाही. मी कुणाला घाबरत नाही. सत्तेसाठी बापासारख्या शरद पवार यांना सोडणाऱ्या मुश्रीफ यांनी मला धमकावू नये. त्यांच्या नेतृत्वात डॉक्टर कसे वागतात हे पाहावे. मला नोटीस पाठवण्यापेक्षा चुकीच्या गोष्टी बंद कराव्यात. अब्रुनुकसानीचा दावा ठोकला तर मी थेट तुरुंगात जाणे पसंत करेन, असे धंगेकर म्हणाले.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत हा भ्रष्टाचारी माणूस आहे. सर्वच विभागांत भ्रष्टाचार सुरू आहे. महसूल असो किंवा गृहखाते; सर्वच महाराष्ट्र लुटायला निघाले आहेत, असा आरोप त्यांनी केला.