इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्या वर्षी क्रमांक एक वर असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोशल मीडियातून दिली. ते म्हणाले की, बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते. एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र २०२२-२३ मध्ये क्रमांक एकवर राहिल्यानंतर आता २०२३-२४ या आर्थिक वर्षांत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आला आहे.
केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने काल ३० मे रोजी ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने गेल्यावर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी प्राप्त केली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षांत : ₹ १,१८,४२२ कोटी तर २०२३-२४ या आर्थिक वर्षांत : ₹ १,२५,१०१ कोटी आहे.
या आर्थिक वर्षांतील गुंतवणूक ही गुजरातमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक आहे, तर दुसर्या क्रमांकावरील गुजरात आणि तिसर्या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षाही अधिक आहे. महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्ष पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो असेही फडणवीस म्हणाले.