नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड भागात एटीएम कार्डची आदला बदल करीत भामट्यांनी महिलेच्या बँक खात्यातून ३० हजार रूपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार घडला. मदतीचा बहाणा करून भामट्यांनी हे कृत्य केले असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलका शिवीजा पाटील (रा.हिंदशक्तीनगर,जुना सायखेडारोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पाटील सोमवारी (दि.२७) जेलरोड भागातील एटीएम बुथवर पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बुथमध्ये त्या पैसे काढत असतांना अज्ञात इसमाने मदतीचा बहाणा करून त्यांचे एटीएम कार्डाची आदला बदल केली. पैसे काढून पाटील घरी परतल्यानंतर पुन्हा त्यांच्या बँक खात्यातून ३० हजार रूपये काढण्यात आल्याचा संदेश प्राप्त झाल्याने ही घटना उघडकीस आली.
भामट्याने एटीएम कार्डची अदला बदल करून बँक खात्यातील पैश्यांवर परस्पर डल्ला मारल्याने त्यांनी तात्काळ पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार गोसावी करीत आहेत.