नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी दुचाकीस्वार वृध्दाचे लॉकेट हातोहात लांबविल्याची घटना काठेगल्लीत घडली. या घटनेत सुमारे ६२ हजार रूपये किमतीची पदक असलेली सोनसाखळी तोतया पोलीसांनी लांबविले असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रम मोतीराम निकम (७४ रा.गणेशनगर,काठेगल्ली) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. निकम गेल्या गुरूवारी (दि.२३) सकाळच्या सुमारास आपली मोपेड दुचाकी घेवून घराबाहेर पडले असता ही घटना घडली. बनकर चौकातील सिटी केअर हॉस्पिटल परिसरात भामट्यांनी त्यांची वाट अडविली. पोलीस असल्याची बतावणी करीत दोघा भामट्यांनी दुचाकीची डिक्की चेक करायची आहे असे सांगून वृध्दाच्या गळय़ातील लॉकेट हातोहात लाबविले. अधिक तपास उपनिरीक्षक तोंडे करीत आहेत.
लॅपटॉपसह मोबाईल असा सुमारे ९१ हजाराचा ऐवज चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बंद घराची कडी उघडून चोरट्यांनी लॅपटॉपसह मोबाईल असा सुमारे ९१ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य शहाजी भिसे (रा.दिंडोरीरोड) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. रविवारी (दि.२६) पहाटे ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी भिसे यांच्या घराची बाहेरून लावलेली कडी उघडून हॉलमधील लॅपटॉप व दोन मोबाईल हॅण्डसेट असा सुमारे ९१ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.