इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोहली खेळतोय आणि भारतीय संघ जिंकतोय. हे सुत्र न्युझीलंडविरूध्दच्या सामन्यात देखील तंतोतंत लागू पडले आणि भारताने न्युझीलंडविरुध्द दोन दशकांपासून सुरू असलेला विजयाचा दुष्काळ आज संपवून टाकला; सुरूवातीला कर्णधार रोहीतच्या ४६, विराट कोहलीच्या ९५, श्रेयस अय्यरच्या ३३ आणि अखेरीस रविंद्र जाडेजाच्या २७ धावांमुळे भारताने न्युझीलंडचे २७३ धावांचे आव्हान ४८ व्या षटकातच पुर्ण करून विश्वचषक स्पर्धेतला सलग पाचवा विजय संपादन केला. १९९२ पासून एकमेव अपवाद वगळता आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत न्युझीलंडला पराभूत करणे भारतीय संघाला जमले नव्हते. आज भारतीय संघाने हा इतिहास बदलून टाकला आहे.
बोल्ट, रविंद्र, लॉकी फर्ग्युसन, सॅन्टनर किंवा मॅट हॅन्री यापैकी कुणालाही भारतीय फलंदाजांनी डोके वर काढायला जागा दिली नाही. सुर्यकूमार धावबाद झाल्यानंतर भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या होत्या परंतु, सध्या उत्कृष्ट फिनीशरच्या भुमिकेत असलेल्या कोहलीने भारतीय संघाची नौका पुन्हा एकहाती तारून नेल्यामुळे कोणत्याचा वादळाचा फटका भारतीय संघाला बसला नाही. या विजयाने भारतीय संघ आता गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
न्यूझीलंडच्या २७३ धावा.
न्यूझीलंडने अतिशय ‘कॅल्क्युलेटेड रिस्क’ घेऊन फलंदाजी करीत भारताला ५० षटकात २७३ धावा करण्याचे आव्हान दिले होते. अगदी सुनिल गावस्कर सारख्या अनुभवी खेळाडूने देखील त्याच्या कारकिर्दीत क्रिकेटच्या मैदानावर फॉग आला म्हणून प्रथमच खेळ थांबविण्याचा प्रसंग अनुभवला अशा धरमशाला मैदानावर मध्ये रोहित शर्मा ने टॉस जिंकून न्यूझीलंडला फलंदाजीचा कॉल दिला. जायबंदी झालेल्या हार्दिक पांड्याच्या जागेवर सूर्यकुमार तर अपयशी ठरत असलेल्या शार्दुल ठाकूर ऐवजी मोहम्मद शमी यांचा संघात समावेश करण्यात आला होता. या विश्वचषकात या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत विजयी घौडदौड कायम ठेवलेली असल्यामुळे आज या दोघांपैकी कोण जिंकणार? याकडे सहाजिकपणे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले होते.
न्यूझीलंडची सुरुवात अतिशय संथ झाली. अतिशय फॉर्मात असलेला डेव्हन कॉन्वे आणि त्याचा साथीदार विल यंग हे दोघे सलामीवीर स्वस्तात परतल्यानंतर रचीन रवींद्र आणि डेरीअल मिशेल यांनी खेळपट्टीवर जणू काही नांगरच टाकला. सुरुवातीला या दोघांनी भारतीय गोलंदाजांवर प्रहार करण्याची हिंमत दाखवली नाही. परंतु नंतर मात्र चौफेर फटकेबाजी करून रविंद्र रचिनने ७५ धावा आणि मिशेल १२७ चेंडूत १३३ धावा करुन न्यूझीलंडतर्फे एक आव्हानात्मक धावसंख्या भारतासमोर ठेवता आली.
अपेक्षेप्रमाणे न्युझीलंडने भारताला एक चांगले आव्हान दिलेले असल्यामुळे या विश्वचषकात आधी खेळल्या गेलेल्या सामन्यांपेक्षा हा सामना भारतासाठी ‘वेगळा’ निश्चितच असणार यासाठी भारतीय खेळाडू आणि चाहत्यांनी मनाची तयारी करून ठेवली होती.
मोहम्मद शमीला संघात घेण्याचा निर्णय अतिशय फायदेशीर ठरला. त्याने १० षटकात ५४ धावा देऊन ५ बळी घेतले. भारतीय गोलंदाजांमध्ये त्याची ही कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरली. आजच्या सामन्यात भारतीय यष्टीरक्षक के.एल. राहुल, क्षेत्ररक्षणात मजबूत असलेला रवींद्र जडेजा आणि नंतर बुमरा यांच्याकडून काही सोपे झेल देखील सुटले.