नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व लेखक पु. ल. देशपांडे यांच्या प्रेरणेतून लेखक डॉ. अनिल अवचट, डॉ अनिता अवचट, डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ३८ वर्षापूर्वी पुणे येथे स्थापन केलेल्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र संस्थेच्या संचालिका डॉ. मुक्ता पुणतांबेकर या शनिवार दिनांक १ जून ,२०२४ रोजी रोटरी हॉल, गंजमाळ नाशिक येथे उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
डॉ. मुक्ता पुणतांबेकर या गेल्या २६ वर्षांपासून व्यसनमुक्तीसाठी कार्यरत असुन संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात व्यसनमुक्तीचे महान कार्य पार पाडत आहेत. त्यांच्या मुक्तांगणच्या व्यसनमुक्तीच्या तीन तापाच्या कार्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने राजभवन, मुंबई येथे राज्यपालांच्या हस्ते ” सूर्यदत्ता राष्ट्रीय स्त्री शक्ती ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नाशिकमध्येही गेली कित्येक वर्ष मुक्तांगणचे व्यसनमुक्तीचे काम अहोरात्र चालू आहे. स्वतः अनील अवचट यांनीही अनेक वेळा नाशिकमध्ये अश्या उपक्रमास मार्गदर्शन केलेले आहे. नाशिकमध्ये २५० ते ३०० मुक्तांगण मित्र कोणाच्याही मदतीस सदैव तत्पर असतात. नाशिक येथे दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी सायंकाळी ६ वाजता रोटरी हॉल, गंजमाळ, नाशिक येथे मुक्तांगण केंद्रातर्फे व्यसन मुक्तीसाठी व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्ती आणि त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार यांच्यासाठी व्यसनमुक्तीसाठी काय करावे यासाठी समुपदेशन केले जात आहे.
या उपक्रमाअंतर्गत शनिवार दिनांक १ जून रोजी नाशिकच्या केंद्रामध्ये स्वतः मुक्तांगणच्या संचालिका डॉ. मुक्ता पुणतांबेकर नाशिककरांना अनमोल मार्गदर्शन करणार आहेत. सोबत मुक्तांगण समन्वयक सौ. सोनाली काळे असणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संदीप धोपावकर, अविनाश ढोली, विश्वास वावधने, योगेश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, आदी सर्व मुक्तांगण मित्र परिवार, नाशिक यांनी केले आहे.