नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नदी संस्कृतीचे अस्तित्व जतन करणे तसेच धर्म समाज व राष्ट्र कार्यात लोकसहभाग वाढविण्यासाठी रामतीर्थ श्री गंगा गोदावरी आरती हा उपक्रम हाती घेणाऱ्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार थोर राष्ट्रसंत परमपूज्य श्री गोविंददेवगिरी महाराज यांना आज 31 मे रोजी सायंकाळी 7:30 वाजता रामतीर्थ गोदाघाट घाट(पाडवा पटांगण) येथे शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे,अशी माहिती, समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी,स्वागत समिती अध्यक्ष श्रीनिवास लोया व स्वागताध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली आहे.
विश्व मांगल्य सभेचे सभाचार्य तसेच नाथ परंपरेचे 18वे पीठाचार्य आचार्य जितेंद्रनाथ महाराज आणि इस्कॉन संचालन समितीच्या गव्हर्निंग बॉडी कमिशनचे सदस्य तसेच इस्कॉनच्या गोवर्धन इको व्हिलेजचे संचालक गौरांग प्रभुजी यांच्या प्रमुख उपस्थितीने या पुरस्कार सोहळ्याची शोभा वाढणार आहे. तसेच विशेष स्वरूपात पुण्यश्लोक आहोल्या देवी होळकर यांचे वावंशज श्रीमंत स्वप्नील राजे होळकर उपस्थित राहणार आहे. या पुरस्काराचे स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र व महाक्षिणा अशा स्वरूप असणार आहे.
प.पू.गोविंद देवगिरीजी महाराज हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष असून श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरेचे उपाध्यक्ष आहेत.श्रीराम मंदिर उभारणीसाठी त्यांनी अपार कष्ट उपसले. सनातन वैदिक धर्म आणि संस्कृती यांचा देश विदेशात प्रसार करण्याचे व्रत घेऊन त्यांनी घरोघरी श्री भगवद्गीता पोहोचविली आहे. हिंदू बांधवांसाठी वेदांतील ज्ञानसागर खुला व्हावा यासाठी देशभरात वेद पाठशाळा सुरू करून तसेच सनातन धर्माच्या चौकटीत राहून त्यांनी जनमानसाला वेददीक्षा दिली आहे. त्यामुळेच त्यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. यावेळी त्यांचा नाशिककरांतर्फे जाहीर नागरी सत्कारही करण्यात येणार आहे. या सोहळ्यास नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.