छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. वादग्रस्त स्टेटस् ठेवणाऱ्या दीपक बद्री नागरे विरोधात मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नागरे याला दोन-अडीचशे जणांच्या जमावाने घरातून बाहेर काढत मारहाण केली. त्यानंतर त्याला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आणले. दीपक हा दुपारी जरांगे यांची भेट घेऊन आला होता. त्यानंतर त्याने जरांगे यांच्यासोबचा सेल्फी ठेवताना आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा आरोप आहे. त्याच्या स्टेटसचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर जमावाने मुकुंदवाडीतील त्याचे घर गाठत मारहाण केली. जरांगे पाटील यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट ‘सोशल मीडिया’वर पसरली आहे.
जरांगे पाटलांच्या समर्थकांनी संबंधित तरुणाला माफी मागायला लावली. माझ्याकडून जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. याबद्दल मी मराठा समाजाची माफी मागतो, असे दीपकने म्हटले आहे.