नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुरगाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरठाण येथे परिचर म्हणुन कार्यरत असलेले माहेश्वर बढे यांनी नियुक्ती नंतर २ महिने सेवा केल्यानंतर सलग २ वर्ष ६ महिने अनाधिकृत गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. श्री. बढे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी २ महिने ७ दिवस कामकाज केले असुन २ वर्ष ०६ महिने अनधिकृत गैरहजर आहेत. यावरुन त्यांना शासकीय सेवेची आवश्यकता नाही व बढे यांच्या अनधिकृत गैरहजेरीमुळे रुग्णाला सेवा देण्यास अडथळा झालेला आहे. बढे यांचे सदर वर्तन हे गंभीर स्वरुपाचे आहे व त्यामुळे त्यांना सार्वजनिक हितास्तव यापुढे जिल्हा परिषद सेवेत ठेवणे योग्य नाही. यामुळे त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशान्वये बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम १९६४ चे ६(२) दोन नुसार विभागीय चौकशी दिनांक २४.०२.२०२३ रोजी विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती या चौकशीमध्ये बढे यांनी समर्पक खुलासा सादर केला नाही, त्याचबरोबर विभागीय चौकशी झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुनावणी वेळी बडे यांना त्यांचे बचावाचे संबंधी साक्षी, पुरावे सादर करण्यास पुरेशी संधी देखील देण्यात आली होती परंतु यासंबंधी समाधानकारक खुलासा त्यांना सादर करता आला नाही. तसेच त्यांनी अनधिकृत गैरहजर कालावधीत सेवेत हजर होण्याबाबत कोणतेही स्वारस्य दाखवलेले नाही. ही सबब त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.