इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे अपघात प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती. अजितदादारांना बोलायला चार दिवस का लागले असा सवालही त्यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी दमानिया यांच्यावर टीका केली होती. ही टीका करतांना चव्हाण म्हणाले आरोप करणा-या व्यक्तीची नार्को टेस्ट व्हायला हवी. मागील एक महिन्याचे त्यांचे कॅाल डिटेल्स चेक करायला हवे कारण त्या राजकीय पक्षाच्या सुपा-या घेऊन बदनाम करत आहे. चव्हाण यांनी अंजली दमानिया रीचार्जवर काम करणारी बाई असे म्हटले होते. त्यानंतर दमानिया या चांगल्याच भडकल्या.
दमानिया यांनी अजितदादाला उद्देशून सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आज प्रचंड राग आला आहे. तुमच्या पक्षातले सूरज चव्हाण इतक्या खालच्या पातळीचे स्टेटमेंट करतात ? शी। आज मला त्या सूरज चव्हाण ने रीचार्जवर काम करणारी बाई म्हटले? मला? मी काय आहे, आणि किती सिध्दांतावर जगते हे तुमच्यापेक्षा चांगलेच कोणालाच माहीत नसेल. ते तुम्ही त्यांना सांगा, मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबरोबर ही भाषा? का? त्यांना राजकारणाबद्दल बोलू नये म्हणून? सध्या मर्यादा न पळणाऱ्या असल्या लोकांना तुम्ही असे बोलण्याची मुभा देता?
मला यावर तुमची ताबडतोब प्रतिक्रिया आणि त्यांचा कडून लिखित स्वरुपात माफी हवी आहे. असले थर्ड ग्रेड स्टेटमेंट्स आणि त्यांची मेंटालिटी त्यांनी त्यांच्या खिश्यात ठेवावी. मला इतर महिला राजकारण्यांची प्रतिक्रिया पण हवी आहे. कारण असली थर्ड ग्रेड भाषा राजकारणात पूर्ण पणे थांबलीच पाहिजे.