इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय निवडणूक आयोगाने नाशिक विभागाची शिक्षक मतदार संघाची निवडणूक २६ जून रोजी होणार आहे. नाशिक विभागात नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. या मतदार संघातून ठाकरे गटाचे आमदार किशोर दराडे हे निवडून गेले होते. त्यांची मुदत ७ जुलै पर्यंत आहे. या मतदार संघात किती मतदार आहे. याची आकडेवारी आता जाहीर करण्यात आली असून त्यात ७० हजार ३४१ इतके मतदान आहे. यात २०१८ रोजी मतदान नोंदणी ५३ हजार ८९२ होती, अंतिम मतदार नोंदणी ३० डिसेंबर २०२३ रोजी ६४ हजार ८०२ होती. त्यानंतर २८ मे प्राप्त मतदान नोंदणी अर्ज संख्या ५ हजार ५३९ असल्याची वर्गवारी करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी ३१ मे रोजी अधिसूचना जारी होणार आहे. तसेच ७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. १० जून रोजी अर्जाची छाननी होणार आहे. तर १२ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. २६ जून रोजी सकाळी ८ ते ४ वेळेत मतदान होणार आहे. १ जूलै रोजी मतमोजणी होणार आहे. ५ जूलै पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.