इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमधील चवदार तळ्याच्या ठिकाणी जात मनुस्मृती दहन करत आज निषेध नोंदवला. हा निषेध नोंदवत असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांच्या हातून पोस्टर फाडले गेले. त्यानंतर राज्यभरातून आव्हाडांवर टीका होत आहे. त्यानंतर आव्हाड यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आहे.
आव्हाड यांनी सांगितले की, मनुस्मृती दहन करण्याकरिता आम्ही महाड येथे आलो, तेव्हा मनुस्मृती लिहिलेलं पुस्तक फाडत असताना, त्यात बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने लक्षातच आले नाही. त्यामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर अनावधानाने फाडले गेले, यामागे आमचा कोणताही दुसरा हेतू यात नव्हता. मात्र, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, पण आम्ही हे मुद्दामुन केले नाही.
तर दुसरीकडे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाडलाच बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक रगडून माफी मागावी अन्यथा याचे तीव्र पडसाद उमटलेले दिसतील. असे म्हटले आहे. त्यांनी या घटनेचा जाहीर निषेध करत म्हटले आहे की, स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध! आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी.