पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– इयत्ता तिसरी ते १२ वी पर्यंतचा पाठ्यक्रम तयार करण्यासाठी शालेय शिक्षण राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला असून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या http://www.maa.ac.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मसुद्याबाबत सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ञ, शैक्षणिक प्रशासन यांनी ३ जून २०२४ पर्यंत आपले अभिप्राय नोंदवावेत असे आवाहन परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.
२०२४ साठीचा आराखडा तयार करताना राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफ-एसई) २०२३ मधील तरतुदी विचारात घेण्यात आल्या असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे अनुषंगाने अंशत: बदल करण्यात आले आहेत. पहिली ते दहावी मराठी व इंग्रजी भाषा अनिवार्य, सहावीपासून हिंदी, संस्कृत व अन्य भारतीय, परदेशी भाषा शिकण्याचा पर्याय, अकरावी व बारावीसाठी दोन भाषांचे शिक्षण असणार आहे.
तिसरीपासून व्यावसायिक शिक्षणाची सोय, तिसरी ते आठवीपर्यंत पूर्व व्यावसायिक कौशल्ये आणि नववीपासून विशेष व्यावसायिक शिक्षणाची सोय उपलब्ध होणार असून त्यामध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता, मशीन लर्निंग, डाटा सायन्स, कृषी आदी नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार गणित आणि विज्ञान विषयांचे दोन स्तरावरील अभ्यासक्रम विचारार्थ आहेत. इयत्ता अकरावी आणि बारावीमध्ये विद्यार्थी कोणत्याही शाखेचे विषय निवडू शकतील. आंतरविद्याशाखीय शिक्षणांतर्गत पर्यावरण शिक्षण प्रस्तावित आहे.
तसेच शालेय शिक्षणामध्ये मूळ भारतीय प्राचीन ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, सांविधानिक, मानवी व नैतिक मूल्यांचे शिक्षण, शाळांमध्ये शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य याबाबत तसेच शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन, शैक्षणिक तंत्रज्ञान, समावेशित शिक्षण, आंतरविद्याशाखील शिक्षण, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण व निरामयता आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
बदलत्या जगाची आव्हाने पेलण्यासाठी मानवी मूल्य, जीवन कौशल्य व नैतिकतेवर आधारित तार्कीक विचार करणारे शिक्षण दिले जाणार आहे. आरोग्य, कला, व्यवसाय शिक्षण या विषयांचे ही प्रचलीत विषयांसोबत महत्त्व वाढवले जाईल. चिकित्सक वृत्ती, विज्ञाननिष्ठ पुराव्यावर आधारित चिकित्सक विचार करण्याची वृत्ती विकसीत होईल. आशयाचे ओझे कमी करुन खालील संकल्पना व महत्त्वाच्या क्षमता मूल्ये कौशल्य विकसित होतील यावर या आराखड्यामध्ये भर देण्यात आला आहे. स्वत: कृतीतून ज्ञान निर्मिती करतील शालांत परीक्षेचे घोकमपट्टी व स्मरणावर आधारित परीक्षा हे स्वरुप बदलून प्राप्त कौशल्यांचे मूल्यमापन करण्यासाठी योजना यात असतील.
शालेय संस्कृती, प्रक्रिया व सहायभूत परिसंस्था यामध्ये शालेय कार्यपद्धती कशी असावी याबाबत आदर्श मार्गदर्शक तत्त्वे, शाळांच्या मानांकनासाठीची तरतूद, अध्ययनपूरक वातावरण निर्मितीसाठी मार्गदर्शक तत्त्वे, शिक्षकांचे सक्षमीकरण व सबलीकरणासाठी उपाययोजना तसेच समाज व कुटुंबाचा सहभाग वाढविण्यासाठी उपक्रम तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील गरजा व अभ्यासक्रमांशी सुसंगत अभ्यासक्रम राज्यात राबविणे आदी बाबींचा समावेश आराखड्यामध्ये करण्यात आला आहे.
या आराखड्याच्या अनुषंगाने सर्वांकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांचा समावेश करुन राज्य अभ्यासक्रम आराखडा सुधारित करण्यात येईल, असेही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी कळविले आहे.