इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छिंदवाडाः मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे एका युवकाने कुटुंबातील आठ जणांची हत्या करून गळफास घेतला. ही घटना आज पहाटे घडली. तामिया तहसीलमधील बोदल कचर गावात ही संतापजनक घटना घडली. आरोपीचे लग्न गेल्या आठवड्यातच झाले. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी त्याच्यावर होशंगाबाद येथे उपचार करण्यात आले होते. आज पहाटे तीन वाजता पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना घरात मृतदेहाचा खच पडलेला दिसला. आरोपीचा मृतदेह काही अंतरावर झाडाला लटकलेला होता.
या युवकाने आधी पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला. त्यानंतर आई-बहीण, भाऊ-वहिनी आणि दोन भाच्या, पुतणे यांची हत्या केली. मामाच्या घरी गेल्यावर त्याने दहा वर्षाच्या चिमुरडीवरही हल्ला केला. त्यानंतर तो जीव वाचवण्यासाठी पळून गेला. त्यानंतर त्यानेही आत्महत्या केली.
बोदल कचर हे आदिवासीबहुल गाव असून आरोपी दिनेशचे घर गावाच्या एका बाजूला आहे. घरातील सर्वांची हत्या केल्यानंतर तो काकाच्या घरी गेला. तिथे त्याने दहा वर्षाच्या मुलावर हल्ला केला. दरम्यान, आजीने आरडाओरड केल्यानंतर आरोपी पळून गेला. आरोपीचा मृतदेह गावापासून १५० मीटर अंतरावरील नाल्याच्या काठावरच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तामिया येथून मुलाला उपचारासाठी छिंदवाडा येथे हलवण्यात आले आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची तपासणी केली आहे.