इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : शरद पवार यांच्या विश्वासू आणि राष्ट्रावादीच्या लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या सोनिया दुहान अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना दुहान यांनी पूर्णविराम दिला आहे. माझी शरद पवार यांच्यावर निष्ठा कायम आहे, मी पक्ष सोडला नाही. कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या काही जणांनी वेगळा निर्णय घेतला, त्या वेळी सुळे तिथे दिसल्या होत्या. मग त्यांनीही पक्ष सोडला, असे म्हणायचे का? धीरज शर्मांसारखे लोक शरद पवारांना का सोडत आहेत? असे सवाल करीत त्या म्हणाल्या, ‘मी आणि धीरज शर्मा यांच्यासाठी शरद पवारच आमचे लीडर आहेत. शरद पवार आमचे नेते होते, आहेत आणि यापुढेही राहतील.’
शरद पवार यांची मुलगी म्हणून खा. सुळे यांच्यासाठी आम्हाला आदर आहे; पण त्या आमच्या प्रमुख कधीच होऊ शकल्या नाहीत. नेता होण्यात त्या कमी पडल्या, अशी टीका त्यांनी केली. मी सध्या इतर कोणता पक्ष जॉईन करणार नाही, असे सांगून दुहान यांनी खा. सुळे यांना मंथन करण्याचा सल्ला दिला. त्यांना लोक का सोडून जात आहेत, याचा विचार त्यांनी करावा, असे त्या म्हणाल्या.
सोनिया दुहान या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करत होत्या. पक्षाच्या प्रवक्त्या म्हणूनही त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काम केले. पुण्यात शिक्षणासाठी असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या सक्रिय झाल्या होत्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला, त् वेळी दुहान यांनी हॉटेलमध्ये जात अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना बाहेर काढले होते.