इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अतिशय ‘कॅल्क्युलेटेड रिस्क’ घेऊन खेळणाऱ्या न्यूझीलंडने भारताला ५० षटकात २७३ धावा करण्याचे आव्हान दिले असून या विश्वचषकात आत्तापर्यंत विजयी घौडदौड कायम ठेवलेले हे दोन्ही संघ पुढच्या आव्हानाशी कसा मुकाबला करतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. अपेक्षेप्रमाणे न्युझीलँडने या सामन्यात भारताला एक चांगले आव्हान दिलेले असल्यामुळे या विश्वचषकात आधी खेळल्या गेलेल्या सामन्यांपेक्षा हा सामना भारतासाठी ‘वेगळा’ निश्चितच असणार आहे.
आज धरमशाला मध्ये रोहित शर्मा ने टॉस जिंकून न्यूझीलंडला फलंदाजीचा कॉल दिला. जायबंदी झालेल्या हार्दिक पांड्याच्या जागेवर सूर्यकुमार तर अपयशी ठरत असलेल्या शार्दुल ठाकूर ऐवजी मोहम्मद शमी यांचा संघात समावेश करण्यात आला. आज मोहम्मद शमीला संघात घेण्याचा निर्णय अतिशय फायदेशीर ठरला. त्याने १० षटकात ५४ धावा देऊन ५ बळी घेतले. भारतीय गोलंदाजांमध्ये त्याची ही कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरली. आता हार्दिक च्या जागेवर बदली म्हणून आलेला सूर्यकुमार यादव हा मिळालेल्या संधीचे कसे सोने करतो याकडे देखील भारतीय चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. आजच्या सामन्यात भारतीय यष्टीरक्षक के.एल. राहुल, क्षेत्ररक्षणात मजबूत असलेला रवींद्र जडेजा आणि नंतर बुमरा यांच्याकडून काही सोपे झेल देखील सुटले.
न्यूझीलंडची सुरुवात अतिशय संथ झाली. स्पर्धेत अतिशय फॉर्मात असलेला डेव्हन कॉन्वे आणि त्याचा साथीदार विल यंग हे दोघे सलामीवीर स्वस्तात परतल्यानंतर रचीन रवींद्र आणि डेरीअल मिशेल यांनी खेळपट्टीवर नांगर टाकला. सुरुवातीला या दोघांनी भारतीय गोलंदाजांवर प्रहार करण्याची हिंमत दाखवली नाही. परंतु नंतर रचिनच्या ७५ धावा आणि मिशेलची १२७ चेंडूत १३३ धावांची खेळी यामुळे न्यूझीलंडला एक आव्हानात्मक धावसंख्या भारतासमोर ठेवता आली. न्यूझीलंडची फलंदाजी बघितल्यानंतर कदाचित तीनशे धावांच्या आसपास आव्हान उभे राहू शकेल अशी एक शक्यता निर्माण झाली होती. परंतु भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या १० षटकांमध्ये फक्त ५४ धावा दिल्याने आता भारतीय फलंदाजांना सामन्यात रंगत आणण्याची संधी मिळाली आहे.