नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळय़ा भागात राहणा-या तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यांना आमिष दाखवून कुणी तरी पळवून नेल्याचा अंदाज कुटूंबियांनी वर्तविल्याने पोलीस दप्तरी अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
केवडीबनातील म्हसोबा मंदिर भागात राहणारी अल्पवयीन मुलगी रविवार (दि.२६) पासून बेपत्ता आहे. सायंकाळच्या सुमारास कुणासही काही एक न सांगता ती घरातून निघून गेली असून तिचे कुणी तरी अपहरण केल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याबाबत तिची मावस बहिणीने फिर्याद दिली आहे.
दुसरी घटना नांदूरनाका भागात घडली. चारी नं. ५ भागातील रामदास जॉकीनगर भागात गेलेली अल्पवयीन मुलगी सोमवार (दि.२७) पासून बेपत्ता आहे. तिचे कुणी तरी अपहरण केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून दोन्ही घटनांप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास हवालदार जाधव व देसाई करीत आहेत.
तिसरी घटना मखमलाबादरोडवरील हनुमानवाडी भागात घडली. राका लॉन्स जवळील प्रोफेसर कॉलनी भागात बांधकाम साईटवर राहणारी मुलगी शनिवार (दि.२५) पासून बेपत्ता आहे. तिला कुणी तरी पळवून नेल्याचा अंदाज कुटूंबियांनी वर्तविला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पंकज सोनवणे करीत आहेत.