इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हवामान खात्याने देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यासाठी महाराष्ट्रासह तब्बल १८ राज्यांना अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात मराठवाडा कोकण आणि गोवा, किनारी कर्नाटक, केरळ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबईत २ ऑक्टोबरपर्यंत चांगला पाऊस सुरू राहील आणि त्यानंतर तो थांबेल. २०२३ च्या मान्सूनचा निरोप घेणारा हा मुंबईसाठी पावसाचा शेवटचा स्पेल असेल, असेही हवामान खात्याने सांगितले आहे. त्याचबरोबर २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत ओडिशात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे राजधानी दिल्लीत पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असे हवामान खात्याने सांगितले आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ओडिशा, झारखंड, गंगेचे पश्चिम बंगाल, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, अंतर्गत कर्नाटकमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. ईशान्य भारत, सिक्कीम, बिहार, नैऋत्य मध्य प्रदेश, गुजरात, विदर्भ, तामिळनाडू आणि आग्नेय राजस्थानमध्ये एक ते दोन तासांत मुसळधार पाऊस होईल, असेही हवामान खात्याने सांगितले आहे.