इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनमाड शहरातील शेकडो कष्टकरी लोकांच्या भविष्यासाठीच्या जमापूंजीवर डल्ला मारलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या मनमाड शाखेवर स्वतः फिर्यादी होऊन आमदार सुहास कांदे यांनी गुन्हा दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. साधारणतः बँकेत व्यवहार करताना किमान चार पाच कर्मचाऱ्यांशी ग्राहकांचा संर्पक येत असतो.या अनुषंगाने झालेला अपहार हा एकट्याने होऊ शकत नसल्याची बाब सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट असतानाही बँकेने एकच खाजगी व्यक्तीवर गुन्हा दाखल करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.
ही गोष्ट आ. सुहास कांदे यांच्या लक्षात आल्याने काल सायंकाळी फसवणूक झालेले ग्राहक, शिवसेना पदाधिकारी यांना सोबत घेऊन आमदारांनी मनमाड पोलीस स्टेशन मध्ये जाऊन युनियन बँक ऑफ इंडिया च्या मनमाड शाखेवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. या घटनेने बँक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची अनेक महिन्यांपासून मुदत ठेवीच्या खोट्या पावत्या व प्रमाणपत्रे देऊन फसवणूक होत असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने ग्राहक हवालदिल झाले होते. सर्वांनी बँकेत धाव घेऊन बँक प्रशासनास जाब विचारला असता, विमा प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या संदीप देशमुख या खाजगी व्यक्तीवर बँकेने गुन्हा दाखल केला.व सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या एका रात्रीत बदल्या करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला होता.
अगोदरच दृष्काळी परिस्थितीने हतबल झालेल्या शेतकरी,नोकरदार,निवृत्तीवेतन धारक, व्यापारी, अन सामान्य कष्टकरी यांनी मग तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्याकडे धाव घेऊन न्याय मिळवून देण्याचे साकडे घातले. या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून आ. सुहास कांदे यांनी आज अखेर सायंकाळी संपूर्ण बँक प्रशासनावर स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला आहे.
आ.सुहास कांदे यांनी पोलीस निरीक्षक अशोक घुगे यांच्याकडे दिलेल्या फिर्यादीत खाजगी विमा एजंट संदीप देशमुख याच्यासह युनियन बँकेच्या संपूर्ण प्रशासनास दोषी मानत सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे. व बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात अपहार झालेल्या सर्व रकमेची भरपाई करून द्यावी.असे आवाहन केले. मात्र त्याचबरोबर याची दखल न घेतल्यास नाशिक च्या मुख्य शाखेसमोर सर्व पीडित ग्राहकांना बरोबर घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला आहे.