इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मालेगावचे माजी महापौर व एमआयाएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. तीन गोळ्या झाडून हे हल्लेखोर फरार झाले. मोटार सायकलवर हे हल्लेखोर आले होते. या हल्ल्यात युनूस ईसा हे गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान, अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावरील हल्लानंतर मालेगावात तणाव आहे.
मध्यरात्री १२ ते १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मलिक यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर उपचारासाठी मलिक यांना नाशिक येथे हलवण्यात आले आहे. मलिक हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबले होते, त्या वेळी अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती यांनी त्यांची भेट घेत घटनेची चौकशी केली आहे. हल्लेखोरांना शोधून त्यांना अटक करण्याची मागणी आ. मुफ्ती यांनी केली आहे. मालेगावात गुंडाराज सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
एक दिवस अगोदरच मालेगाव जवळील झोडगे येथील पेट्रोलपंपावर खंडणीसाठी गोळीबार झाल्याची घटना घडली. त्यानंतर दुस-या दिवशी ही घटना घडल्यामुळे मालेगावमध्ये नेमकं चाललं काय असा प्रश्न आता उपस्थितीत होत आहे.