इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आयकर विभागाने नाशिकमधील सुराणा ज्वेलर्सवर टाकलेल्या छाप्यात फर्निचर फोडताच नोटांच्या भिंती मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या धाडीत रोकड मोजण्यासाठी १३ तास लागले. त्यानंतर ही कॅश नेण्यासाठी सात गाडयांचा वापर करण्यात आला. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये सुमारे २६ कोटी रुपये रोख आणि ९० कोटी रुपयांच्या बेहिशेबी संपत्तीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. गेल्या तीन दिवस आयकर विभागाचे पथक ठाण मांडून होते. ३० तास ही तपासणी झाली.
नागपूर, जळगाव व नाशिक येथील आयकर पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत ५० ते ५५ अधिकारी उपस्थितीत होते. या तपासणीत बंगला, घर व कार्यालयाची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे खासगी लॅाकर्स व बँकांमधील लॅाकर्सही तपासण्यात आले. नाशिक येथील कॅालेजरोड वरील ज्वेलर्स, बंगला व मनमाड येथील घरी हा छापा गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास टाकण्यात आला होता. या कारवाईत पेन ड्रायव्ह व हार्ड डिस्कही जप्त करण्यात आली आहे.
आयकर अन्वेषण विभागाचे महानिर्देशक सतीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त निर्देशांच्या निगराणीखाली नाशिक, नागपूर, जळगावच्या अन्वेषण पथकाने ही कारवाई केली.