नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणा-या दोन तडिपारांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. बजरंगवाडी व दिंडोरीरोडवरील मार्केट यार्ड भागात संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या असून याप्रकरणी मुंबईनाका व पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आदित्य सुनिल गायकवाड उर्फ टग्या (२१) व अजय प्रकाश कालेकर (२६ रा.अश्वमेध नगर,आरटीओ कॉर्नर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित तडिपारांची नावे आहेत. टग्या गायकवाड याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमिवर त्यास शहर पोलीसांनी दोन वर्षासाठी शहर व जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच गुरूवारी (दि.२३) रात्री तो बजरंगवाडी येथील हनुमान मंदिर परिसरात मिळून आला. याबाबत अंमलदार सागर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.
दुसरी कारवाई दिंडोरीरोडवरील मार्केट यार्ड भागात करण्यात आली. चोरी आणि जबरीलुटीचे गुन्हे दाखल असलेल्या अजय कालेकर यास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. तीन महिन्यांसाठी हद्दपारीची कारवाई केलेली असतांना तो कुठलीही परवानगी न घेता शुक्रवारी (दि.२४) रात्री शहरात वावरतांना मिळून आला. याबाबत अंमलदार घनश्याम महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार कुलकर्णी करीत आहेत.