नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक शहर व परिसरात घरफोड्यांचे सत्र सुरुच आहे. वेगवेगळया भागात झालेल्या चार घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा पाच लाखाचा ऐवज लंपास केला. या घरफोड्यांमध्ये दोन भरदिवसा झाल्या आहेत. याप्रकरणी सरकारवाडा आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना याच भागातील घडली. विजय बाबूराव भामरे (रा.विजयनगर,चेहडी पंपीग) यांनी फिर्याद दिली आहे. भामटे कुटूंबिय गुरूवारी (दि.२३) बाहेरगावी गेले असता मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममध्ये ठेवलेल्या कपाटातील रोकड व सोन्याचे दागिणे असा सुमारे १ लाख २१ हजाराचा ऐवज चोरून नेला. तिन्ही घटनांप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक प्रविण सुर्यवंशी व उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
तर दुसरी घरफोडी पंडीत कॉलनी भागात झाली. याबाबत उध्दव तानाजी पवार (रा.मनिषा सोसा.लेन नं.८ पंडीत कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. पवार कुटूंबिय गेल्या काही महिन्यांपासून पुणे येथे गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे ग्रिल तोडून घरातील एलईडी टिव्ही,तांब्या पितळाचे साहित्य, गॅस सिलेंडर,इलेक्ट्रीक शेगडी,देवांच्या मुर्त्या व महत्वाचे कागदपत्र असा सुमारे ३६ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार खोडे करीत आहेत.
तिस-या घरफोडीत गंगापाडळी – लाखलगाव य़ेथे झाली. विठाबाई बाजीराव वलवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वलवे कुटूंबिय गुरूवारी (दि.२३) सकाळच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ५५ हजाराचा ऐवज चोरून नेला.
चौथी घटना चेहडी फाटा भागात घडली. शांताराम विष्णू मानकर (रा.चेहडी फाटा,सामनगाव ता.जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. मानकर कुटूंबिय गुरूवारी (दि.२३) घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख १२ हजार ३०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला.