इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – काही महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ‘आप मिलने का समय नहीं देते’ असे म्हणत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. एकीकडे भाजपमधील जुन्या निष्ठावान नेत्यांची अशी स्थिती असताना पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कट्टर काँग्रेसी नेत्याच्या प्रेम अमित शहाच नाही तर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आहेत.
भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिंदे आणि अजित पवार गटातील कोणत्याही नेत्याला भाजपच्या केंद्रातील वरीष्ठांना भेटायचे असेल तर आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाक्यावर थांबावे लागते, असे बोलले जाते. फडणवीसांच्या मध्यस्थीशिवाय ते शक्य होत नाही, असे चित्र आहे. पण वर्षानुवर्षे काँग्रेसनिष्ठ असलेल्या राधाकृष्ण विखे-पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून पाच वर्षांत अशी काही जादू केली आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मतदारसंघात दुसऱ्यांदा दौरा करणार आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विखे-पाटलांनी आपल्या मतदारसंघात येण्याचा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला होता. त्यावेळी ते आलेही होते. याला फार तर पाच वर्षे झाली असतील. पण आता पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघातील लोणी गावात एका कार्यक्रमासाठी येण्याचे आमंत्रण विखे पाटलांनी दिले आणि पंतप्रधान तयारही झाले. येत्या गुरुवारी (२६ ऑक्टोबर) हा कार्यक्रम होणार आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी विखे पाटलांच्या मतदारसंघात हजेरी लावली आहे.
पराभव झाला तरीही
काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी विखे-पाटलांना मात दिली होती. याशिवाय विखे-पाटलांच्या भाजपप्रवेशानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आमदारांची संख्याही कमी झाली होती. या साऱ्या पराभवासाठी विखे-पाटलांनाच जबाबदार धरण्यात आले होते. पण असे असतानाही केंद्रातील भाजप नेत्यांच्या ‘गुडलिस्ट’मध्ये स्थान मिळविण्याची किमया त्यांनी साधली आहे. यामागे विखे पाटलांचे सहकार क्षेत्रातील वजन कारणीभूत असल्याचे बोलले जाते.