नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -: धात्रक फाटा भागात कारमधून प्रवास करणा-या नागासाधूने एका पादचारी वृध्दाच्या गळयातील सोनसाखळी हातोहात लंपास केली. रूद्राक्ष मणीची माळ गळयात घालण्याचा बहाणा करून भामट्या बाबाने वृध्दाच्या गळयातील सुमारे ५० हजार रूपये किमतीचे लॉकेट लांबविले असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामजोखन तपेश्वर गुप्ता (७७ रा.सागर व्हिलेज,गुप्ता स्विटच्या मागे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गुप्ता बुधवारी (दि.२२) सकाळी नेहमीप्रमाणे शतपावलीसाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली. परिसरातील धनदायी पिठाची गिरणी भागातून ते रस्त्याने पायी जात असतांना स्विफ्ट कार त्यांच्या जवळ येवून थांबली. चालकाच्या बाजूला बसलेल्या कारमधील नागासाधूने जवळ बोलावून घेत त्यांना पत्ता विचारला.
यावेळी गुप्ता यांच्या डोक्यावर हात ठेवून बाबाने गळयातील रूद्राक्ष माळ काढून गुप्ता यांच्या गळयात घालून पुन्हा काढून घेतली. यावेळी गुप्ता यांच्या गळयातील सुमारे ५० हजार रूपये किमतीची सोनसाखळीही भामट्याने न कळत काढून घेतली. हा प्रकार घरी गेल्यावर गुप्ता यांच्या लक्षात आला त्यांनी तात्काळ पोलीसात धाव घेत फिर्याद दाखल केली असून अधिक तपास उपनिरीक्षक पठारे करीत आहेत.