पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे येथील अपघातानंतर राजकीय पक्षात आरोप प्रत्यारोप सुरु असतांना काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी थेट वॉटर्स नावाच्या पबमध्ये कॅान्स्टेबलच पार्टी करतांनाचा फोटो शेअर करुन एक पोस्ट टाकली आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
या पोस्टमध्ये धंगेकर यांनी म्हटले आहे की, राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो , कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार…?
असो, आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार आहे.
दिवस १ला – मुंढवा पोलीस स्टेशन
हे पोलीस स्टेशन अवघे ३ कर्मचारी चालवतात.त्यापैकी निलेश पालवे ,काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स ,हॉटेल येथून हप्ते गोळा करण्याचे काम करतात.
सोबत एक फोटो जोडत आहे ज्यात हे वसुली कॉन्स्टेबल #वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करतांना दिसून येत आहेत.
आम्हा पुणेकरांच्या वतीने आपणांस विनंती आहे की,पुणे बिघडविणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलची यांची तातडीने चौकशी करत यांना निलंबित करा ,अन्यथा ४८ तासात यांचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील.
पुन्हा भेटुयात नव्या पोलीस स्टेशनचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन.
जय हिंद ,जय पुणेकर..!