नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनआणि ब्रीज फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने नाशिकमध्ये २४ ते २६ मे, २०२४ दरम्यान ज्युनियर आणि सब-ज्युनियर गटाच्या ” तोलानी चषक ” राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तोलानी शिपिंग कंपनी यांनी पुरस्कृत केलेल्या या स्पर्धेचे आयोजन नाशिकच्या गंगापूर रोड, सोमेश्वर मंदिरजवळील गुप्ता गार्डन येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन नाशिक ब्रीज असोसिएशनचे अध्यक्ष तथा ब्रीज या खेळाच्या प्रचार-प्रसार यासाठी कायमच कार्यरत असणाऱ्या मित्र विहार स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष विनोद कपूर यांच्या हस्ते पार पडणार आहे. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक अनिल पाध्ये, केशव सामंत, विनय देसाई, गिरीश बिजूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
या स्पर्धेमध्ये भारताच्या १५ विविध राज्यांच्या ९० खेळाडूंनी सहभाग नोंदवून चांगला प्रतिसाद दिला आहे. या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय ब्रीज फेडेरेशन यांच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार १६ वर्षे, २१ वर्षे, २६ वर्षे आणि ३१ वर्षे मुले आणि मुली या चार वयोगटाचा समावेश असणार आहे. या स्पर्धेमध्ये टीम चॅम्पिअनशिप, पेअर्स प्रकार आणि वैयक्तिक अश्या विविध प्रकारात ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंमध्ये सन २०२१ आणि सन २०२२ या वर्षी जागतिक ब्रीज चॅम्पिअनशिप स्पर्धेमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कास्य अशी पदके मिळविणाऱ्या खेळाडूंचा समावेश असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये चांगलीच चुरस दिसून येणार आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे या खेळाडूंमधून भारताच्या संघासाठी निवड होणार आहे. हे निवड झालेले खेळाडू दिनांक १३ ते १८ जुलै, २०२४ दरम्यान पोलंड येथे आयोजित जागितिक ब्रिज स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील अशी माहिती या स्पर्धेचे आयोजन प्रमुख तथा महाराष्ट्र ब्रिज असोसिएशनचे सचिव हेमंत पांडे यांनी दिली.