इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई, चारा टंचाई आणि मान्सूनपूर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर येथे विशेष आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली.
या बैठकीत पिण्याचे पाणी, जनावरांसाठी लागणारे पिण्याचे पाणी, चारा तसेच त्याची उपलब्धता याचा प्रामुख्याने आढावा घेण्यात आला. सध्या ज्या गावांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा होतो आहे, त्यांना अतिरिक्त पाण्याची अथवा चाऱ्याची आवश्यकता भासल्यास मागणी नोंदवल्यानंतर तीन दिवसांच्या आत त्याची पूर्तता करण्याचे निर्देश दिले.
यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, मुख्य सचिव नितीन करीर, पालकमंत्री संदिपान भुमरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, विभागीय आयुक्त मधुकर आर्दड तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जनावरांसाठी चाऱ्याची लागवड करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता, त्या माध्यमातून पुरेसा चारा उपलब्ध असल्याचे समजले. धरणांमध्ये मोजकाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने त्याचा वापर विचारपूर्वक करावा तसेच पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देऊन इतर वापर टाळावा, असे निर्देश दिले.