इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत स्फोट होऊन झालेल्या अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले आहेत. आज या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची विचारपूस केली.
यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या घटनेनंतर डोंबिवली एमआयडीसी परिसरातील कंपन्यांचे उद्योग, कामगार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचे संचालक यांच्या माध्यमातून ए, बी, सी, अशा तीन श्रेणीत वर्गीकरण करून त्यातील अतिधोकादायक कंपन्या इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा पर्याय या कंपन्यांना देण्यात येणार आहे. तसेच राज्यातील इतर एमआयडीसीमधील कंपन्यांच्या सुरक्षिततेची देखील तपासणी करण्याचे निर्देश उद्योग मंत्र्यांना दिले आहेत. या घटनेचा तपास करत अपघाताची करणे शोधून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे यावेळी सांगितले.