इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सांगलीः लोकसभा निवडणुकीचे मतदान संपले तर सांगलीचा तिढा काही संपत नाही. महाविकास आघाडीबरोबर बंड करुन विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी केली. त्यानंतर काँग्रेसने त्यांच्या विरोधात प्रचार केला. पण, निवडणुका संपल्यानंतर काँग्रेसने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला विशाल पाटील यांनी हजेरी लावल्यामुळे येथील राजकारण चांगलेच तापले. शिवसेनेच्या ठाकरे गटाने तर थेट जाहीर संताप व्यक्त केला. काँग्रेसने पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केली नसल्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंतची काँग्रेस त्यांच्या पाठिशी होती, असा आरोप ठाकरे गटाचे सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केला. या प्रकरणी काँग्रेसचे स्थानिक नेते पृथ्वीराज पाटील यांची हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
विभुते पुढे म्हणाले की, सांगलीत काँग्रेसने गद्दारी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने प्रारंभी आम्हाला मदत केली; परंतु शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसनेही विशाल पाटलांना मदत केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. आता काँग्रेसचे स्नेहभोजन हा गद्दारी केल्याचा अधिकृत पुरावा आहे, अशी टीका विभुते यांनी केली आहे.
सांगलीत महाविकास आघाडी अबाधित ठेवायची असेल, तर काँग्रेसने विशाल पाटील यांच्यासह पृथ्वीराज पाटील यांची हकालपट्टी करावी, अन्यथा जिल्ह्यात महाविकास आघाडी अस्तित्वात राहणार नाही, असा इशारा त्यांनी काँग्रेसला दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांना विधानसभेचे तोंड बघू देणार नाही, अशी शपथ शिवसेनेने घेतली आहे. आता काँग्रेसने मदतीची अपेक्षा ठेवू नये. आमची लायकी निवडून येण्याची नसली तरी तुम्हाला पाडण्याची नक्कीच आहे, असा इशारा विभुते यांनी या वेळी दिला. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापले आहे.