इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदाबाद – गरबा नृत्य हे गुजरात राज्याचे पारंपरिक नृत्य आहे. त्याचप्रमाणे गरबा हा गुजरातचा लोककला प्रकार आहे. गरबा सादर करताना नर्तक वर्तुळ आकारात ठेका धरतात. हा खेळ आता गुजरातपुरता मर्यादित राहीला नाही. देशभरात अनेक राज्यात गरबा खेळला जातो. काही ठिकाणी याला दांडीया म्हणतात, सर्व जाती-धर्माचे आणि प्रांतातील लोक गरबा मध्ये नाचतात. नवरात्रीत गरब्याच्या नृत्यात उमटणाऱ्या आवाजाने व तरंगांनी आई अंबे जागृत होते. म्हणून नवरात्रीच्या नऊ रात्री गरबा आणि दांडिया खेळला जातो. गरब्याला आता अनन्यसाधारण महत्त्व आले असून अनेक ठिकाणी गरबा-दांडियाचं आयोजन केलं जाते.
अनेक आयोजक मोठ्या सेलिब्रिटींना बोलावून गरबा नाईटचे आयोजन करतात. अनेक प्रसिद्ध गायक आणि नर्तक येथे येऊन गरबा रसिकांचे मनोरंजन करतात. मात्र गुजरातमध्ये नवरात्रीनिमित्त गरबा खेळताना हार्ट अटॅकने गेल्या २४ तासांत गरबा १२ जणांचा मृत्यू झाला आहे. गरबामध्ये प्रचंड प्रमाणात अविश्रांतपणे सतत नृत्य केल्याने शरीराला घाम आणि थकवा येऊन हे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते, तसेच डिजेच्या आवाजानेही हृदयाच्या कंपन्याला जास्त आघात झाल्याने मृत्यू झाल्या असावेत, असे म्हटले जाते.
यात किशोरवयीन मुले, तरुण आणि प्रौढांचा समावेश आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात अचानक होत असलेल्या या मृत्यूमुळे चिंता वाढली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून राज्यात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत असून या मागे अनेक कारणे असू शकतात, परंतु चिंतेची बाब म्हणजे किशोरवयीन मुले आणि तरुण प्रौढ त्याचे बळी ठरत आहेत. नवरात्रीच्या ६ दिवसांत १०८ क्रमांकावर म्हणजे एमर्जन्सी ऍम्बुलन्स सेवेचा नंबरवर सुमारे ५२१ कॉल आले आहेत. यातील बहुतांश फोन हृदयविकाराचा झटका आणि धाप लागण्यासंबंधीचे आहेत.