नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कोण कशी फसवणूक करेल हे सांगता येत नाही. नाशिकच्या महिलेला असाच ७६ लाखाला परिचीताने गंडा घातला आहे. सोलापूर येथील सराफ व्यावसायीकांच्या भिशीत गुंतवणुक केल्यास मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवून ७६ लाख ४८ हजाराची फसवणूक करण्यात आली आहे. या घटनेत भामट्यांनी महिलेच्या दागिण्यांचा अपहार करीत फ्लॅटवरही परस्पर कर्ज काढल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात उस्मानाबाद जिह्यातील एकाच कुटुंबातील तिघांविरूध्द फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
प्रशांत रविंद्र पोतदार,रविंद्र पोतदार व रेणूका रविंद्र पोतदार (रा.अंदूर ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत रूपाली धिरज पंडीत (रा.पवार लॉन्स समोर,मखमलाबाद शिवार) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित व फिर्यादी एकमेकांचे परिचीत असून या ओळखीतून ही फसवणुक झाली. सन.२०१७ मध्ये संशयित पंडीत यांच्याकडे आले होते. यावेळी सोलापूर येथील सराफ व्यावसायीकांची मोठी भिशी असून या भिशीत गुंतवणुक केल्यास अल्पावधीत मोठा परतावा मिळेल अशी ग्वाही पंडित यांना देण्यात आली.
त्यामुळे पंडीत या पोतदार कुटूंबियांच्या आश्वासनास बळी पडल्या. पंडीत यांनी भिशीत गुंतवणुक करण्यासाठी लाखोंची रक्कम तसेच दागिण्यांची शुध्दी करण्यासाठी घरातील अलंकार संशयितांच्या स्वाधिन केले. मात्र अद्याप भिशीच्या रकमेसह परताव्याची रक्कमही त्यांच्या पदरात पडली नाही. यातच त्यांच्या नाशिकच्या फ्लॅटवर संशयितांनी बनावट साक्षरी करून परस्पर कर्ज काढल्याचे निदर्शनास आल्याने फसवणुकीचा हा प्रकार समोर आला असून या घटनेत पंडीत यांची ७६ लाख ४७ हजार ६२० रूपयांची फसवणुक करण्यात आली आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक ढवळे करीत आहेत.