सुनिता कातकाडे (कर सल्लागार)
महिला म्हटल्या की, साधारणपणे “चूल अन मुलं” या चौकटीतच आयुष्य जगत असतात. परंतु, जग जस बदलतंय तसं महिलांमध्ये देखील बदल घडत असून आधुनिक काळात महिला साक्षरतेचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात प्राविण्य मिळवत आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही महिलांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल झालेला दिसून येत आहे. महिलाचे नोकरीचे प्रमाण वाढत असतानाच काही महिला छोटे – मोठे व्यवसाय करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत असल्याने महिलांना आर्थिक स्वायत्तता, सुरक्षा प्रदान होत आहे. परंतु महिलांनी गुंतवणुकीला देखील प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे कर सल्लागार सुनीता कातकाडे यांनी सांगितले आहे.
महिला ह्या घरातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांना आर्थिक बाबीही हाताळाव्या लागतात जसे की, दैनंदिन स्वरूपातील कुटुंब चालविण्यासाठी होणारा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, भविष्यात मुलांची लग्न, घर किंवा इतर मालमत्ता खरेदी अशा प्रकारच्या बऱ्याच गरजा व स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक तुम्हाला उपयोगी ठरत असते.
महिलांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यातील विशेष केवळ महिलांसाठीच उपलब्ध असलेला गुंतवणुकीचा प्रकार म्हणजे “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र” याबद्दलची माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात “महिला सन्मान बचत पत्र” योजनेची घोषणा केली होती. ही योजना सुरू करण्यामागे सरकारचा मुख्य उद्देश महिलांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करणे तसेच त्यांना चांगले व्याज देऊन गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. या योजनेद्वारे महिलांना पोस्ट ऑफिसमध्ये/बँकेत खाते उघडून जमा केलेल्या रकमेवर ७.५% निश्चित व्याजदर मिळेल. त्यामुळे योजनेद्वारे छोट्या बजेटला चालना मिळून महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र गुंतवणूकदारांसाठी हि योजना एप्रिल २०२३ पासून सुरु असून ती मार्च २०२५ पर्यंत या दोन वर्षांसाठी उपलब्ध असलेली एक-वेळची योजना आहे. या योजनेचा फायदा महिला स्वतः गुंतवणुकीसाठी वापरू शकते किंवा अल्पवयीन मुलीच्या वतीने पालकाद्वारे. या योजनेच्या ठेवींवर वार्षिक ७.५% दराने व्याज मिळते. व्याज तिमाही आधारावर चक्रवाढ केले जाते आणि तुमच्या खात्यात जमा होते. या योजने अंतर्गत केलेली गुंतवणूक आयकर कायदा, १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत कर बचत लाभासाठी पात्र नाही. म्हणजेच, तुम्हाला कोणतेही कर लाभ मिळणार नाहीत. या योजने अंतर्गत मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जातो.
महिला त्यांच्या सोईनुसार इतरही गुंतवणुकीचे पर्याय स्वीकारू शकतात. यात अलीकडच्या काळात अधिक पसंती मिळत असलेल्या SIP द्वारे म्युच्युअल फंड, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) तसेच पारंपरिक मुदत ठेव (FDs) इ. अशा योजनेत देखील गुंतवणूक करू शकतात.
सौ. सुनिता योगेश कातकाडे
कर सल्लागार, नाशिक
मो. ९८८१८४३६१७
ईमेल : kkservices31@gmail.com