इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लंडनः भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी देशात चार जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुका होण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेने निवडणुकीच्या तारखांबाबत सुरू असलेल्या अटकळींना पूर्णविराम मिळाला. सुनक यांनी सहा आठवड्यांत मतदान होणार असल्याचे जाहीर केले.
पंतप्रधान सुनक हे किंग चार्ल्स यांना निवडणुकीच्या तारखेची औपचारिक माहिती देतील आणि त्यानंतर लवकरच संसद विसर्जित केली जाईल. सुनक यांनी आपल्या कार्यकाळातील कामकाजाचा आढावा रेकॉर्ड ब्रिटिश मतदारांसमोर मांडला. ते म्हणाले, की तुम्हाला मजबूत सुरक्षा प्रदान करण्यासाठी मी माझ्या सामर्थ्याने सर्वकाही करेन. हे माझे तुम्हाला वचन आहे… आता ब्रिटनने आपले भविष्य निवडण्याची वेळ आली आहे.
सुनक यांनी त्यांच्या दहा डाऊनिंग स्ट्रीट निवासस्थानाबाहेर घोषणा केली, की त्यांनी मुदतपूर्व निवडणुकीची तयारी केली आहे. त्यांचा पक्ष मतचाचण्यात मागे असताना त्यांनी निवडणूक लवकर घेण्याचे धाडस केले आहे. हे धोकादायक धोरण आहे. त्यांच्याच पक्षातील काहींपासून ते अलिप्त आहेत.
सुनक हे गेल्या आठ वर्षांतील ब्रिटनचे पाचवे पंतप्रधान आहेत. लिझ ट्रस यांनी राजीनामा दिल्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांनी शपथ घेतली. सुनक यांनी अलीकडील आर्थिक सुधारणा, महागाई कमी होणे आणि जवळपास तीन वर्षांतील सर्वात वेगवान आर्थिक वाढ लक्षात घेऊन निवडणुकीत उतरण्याचा अचानक निर्णय घेतला आहे. मात्र याकडे जुगार म्हणून पाहिले जात आहे.