पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कल्याणीनगर परिसरात हिट अँण्ड रन प्रकरणावर सर्वत्र संताप व्यक्त केला जात असतांना जयंत पाटील यांचा भाचा आणि शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे ‘सोशल मीडिया’वर एक पोस्ट शेअर केली आहे. तनपुरे यांनी या अपघातप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या मुलाविषयीचा एक प्रकार या पोस्टमध्ये केला असून तो चांगलाच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये नावाचा उल्लेख मात्र त्यांनी टाळला आहे.
सोनाली तनपुरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे, की कल्याणीनगर येथील कार अपघातानंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्या वेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती; मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही माझ्या मुलाच्या मनावर आहे.
वाईट प्रवृत्तीच्या मुलांची दखल वेळीच घेतली असती, तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता, असे नमूद करून सोनाली तनपुरे यांनी म्हटले आहे, की त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण-तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.