इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणूक काळातील अनेक व्हिडिओ शेअर करत आमदार रोहित पवार यांनी ब-याच गोष्टी समोर आणल्या. त्यामुळे त्यांचे व्हिडिओ व पोस्टही चर्चेत राहिली. सोमवारी झालेल्या मतदानाच्या दिवसाचा असाच एक व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला असून त्यात भाजपचे उमेदवार पोलीस अधिकाऱ्यांना अत्यंत खालच्या पातळीवर शिव्या देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशाप्रकारची मस्ती भाजप नेत्यांच्या अंगात येतेच कुठून, असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत केला आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, केंद्रीयमंत्री राहिलेले भिवंडी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पोलीस अधिकाऱ्यांना अत्यंत खालच्या पातळीवर शिव्या देतात. अशाप्रकारची मस्ती भाजप नेत्यांच्या अंगात येतेच कुठून, असा प्रश्न पडतो. कदाचित सागर बंगल्यावर बसलेल्या त्यांच्या बॉसचे विशेष संरक्षण असल्याने ही मस्ती येत असावी. असो, पण हा अहंकार आणि सत्तेची मस्ती चार जूनला उतरल्याशिवाय राहणार नाही!