छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जातीयवाद न करण्याची जबाबदारी केवळ मराठा समाजाचीच नाही, अशा भाषेत मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ठणकावले आहे. सरकारने आमचे ऐकले नाही, तर आम्हाला सत्तेत घुसावे लागेल. सत्ता काबीज केल्यानंतर सगळ्या गोष्टी आपोआप होतील, असा इशारा त्यांनी दिला.
जरांगे यांना प्रकृती बिघडल्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यंना डिस्चार्ज देण्यात आला. आंतरवाली सराटी या आपल्या गावाकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सहा जूनपर्यंत आरक्षण देण्याची मागणी करताना चार जूनपासून उपोषणावर ठाम आहे, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, की मी साडेतीन महिन्यांपूर्वी ४ जून रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार माझे उपोषण होईल. त्यात कोणताही बदल नाही. मराठा व कुणबी एकच असल्याचा कायदा मंजूर करावा, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावली, गुन्हे मागे घ्यावेत, शिंदे समितीचा कार्यकाळ आणखी एक वर्ष वाढवावा, या मागण्यांसाठी उपोषण करण्यात येणार आहे. सरकारने सहा जूनपर्यंत आरक्षण दिले, तर आंदोलन करणार नाही, असे त्यांनी सांगितले.