नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका सर्कल येथे उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे मनपा आयुक्त डॉ.अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंके यांना लेखी पत्र दिले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिक शहरातील द्वारका सर्कल येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी हाजी अलीच्या धर्तीवर येथील सर्कल काढून टाकण्याची नितांत आवश्यकता आहे. मुंबई शहरातील हाजी अली सर्कल असतांना अशीच वाहतूक कोंडी होत होती. त्या ठिकाणचे सर्कल काढून सरळ वाहतूक केल्यापासून येथील वाहतूक सुरळीत सुरु आहे. त्याचधर्तीवर नाशिक शहरातील द्वारका सर्कल काढून वाहतूक सरळ करण्यात यावी अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी लेखी पत्राद्वारे केल्या आहेत.