इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : पोलिस कुठल्या पुराव्यावरून आरोपींचा कसा शोध लावतील, याचा काही भरवसा राहिलेला नाही. घटनास्थळी सापडलेल्या दोन दातांवरून आरोपीचा शोध लावल्याचा अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने पोलिसांच्या कर्तव्याचे कौतुक करण्यात येत आहे.
गुन्हा घडल्याच्या ठिकाणी सापडलेल्या दोन तुटलेल्या दातांवरून ‘स्पायडर मॅन’ चोरापर्यंत पोहोचण्यात मुंबईतील एमएचबी पोलिसांना यश आले आहे. अटक आरोपीचे नाव रोहित राठोड (२९) असे असून त्याच्यावर १९ हून अधिक गुन्हे नोंद आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
एमएचबी कॉलनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राठोडने जून महिन्यात चोरी करून किचनच्या खिडकीतून पळून जाण्यासाठी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. त्यात तो खाली पडला आणि त्याचे दोन दात तुटले, तसेच एक पायही फ्रेंक्चर झाला. त्याच्या मागावर असलेल्या एमएचबी कॉलनी पोलिसांनी चार महिन्यांनंतर त्याला पकडले. अखेर गेल्या आठवड्यात आरोपी वाकोला येथील रुग्णालयात सापडला जिथे त्याच्यावर उपचार सुरू होते. पाळत ठेवत डिस्चार्ज झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. राठोडवर घरफोडीच्या गुन्ह्यांसह डीएन नगर, कांदिवली, बोरिवली, वाकोला, सांताक्रूझ, दहिसर, कस्तुरबा मार्ग आणि इतर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून वाकोला पोलिसांनी देखील त्याला ‘तडीपार’ केले होते.
सीसीटीव्हीत कैद पण अंधारात असप्ष्ट
राठोड हा पळताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. पण, अंधार असल्याने तो स्पष्ट दिसत नसल्यामुळे पोलिसांसमोर त्याला शोधण्याचे मोठे आव्हान होते. पण, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेचवर न थांबता चौकशी सुरुचे केली. त्यासाठी परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त अजयकुमार बंसल आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथक तयार करण्यात आली. त्यानंतर आरोपीचा शोध सुरू झाला. पण, घटनास्थळावरून सापडलेल्या दोन तुटलेल्या दातांनी पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यास मदत झाली….व आरोपी गजाआड झाला.