नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सुपर ५० उपक्रमातील विद्यार्थ्यांचा इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला, सुपर ५० उपक्रम २०२२ अंतर्गत निवड झालेले १०० टक्के विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले असून यामध्ये २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्य मिळवले असून २९ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
सुपर ५० उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी मुलांमध्ये प्रथम क्रमांक हा ८४.८३ टक्के मिळवून सुशांत वाळू बागुल प्राप्त केला असून, मुलींमध्ये डिंपल अशोक बागुल या विद्यार्थिनींनी ८०.६७ टक्के मिळवून मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे. सुशांत बागुल या विद्यार्थ्याने भौतिकशास्त्र विषयात ८४ गुण गणित या विषयात ९६ व जीवशास्त्र या विषयात ९६ गुण प्राप्त करून तीन विषयात प्रथम क्रमांक मिळवला आहे, त्याचबरोबर रसायनशास्त्र या विषयात प्रणव शशिकांत गायकवाड या विद्यार्थ्याने ९१ गुण मिळवून यश संपादन केले आहे. सुपर ५० उपक्रमातील २२ विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षेत यश संपादन केले असून ते आता जेईई ऍडव्हान्स या प्रवेशासाठी प्रविष्ट होणार आहेत.
उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी अभिनंदन केली असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपशिक्षणाधिकारी उदय देवरे, गटशिक्षणाधिकारी मीता चौधरी, विस्तार अधिकारी मनीषा पिंगळकर, उपाध्ये क्लासचे संचालक भारत टाकेकर, प्राचार्य संतोष तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले.