निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कौटुंबिक कारणावरुन पत्नीसोबत वाद घालून तिची झोपेतच कु-हाडीने हत्या केल्याच्या आरोपात श्रावण किसन गायकवाड ( वय ३७) रा. रौळस ता. निफाड यास दोषी ठरवत निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे
निफाड तालुक्यातील रौळस येथे श्रावण किसन गायकवाड पत्नी सिमा श्रावण गायकवाड दोन मुले हर्षद (१० वर्ष) व जयेश (७ वर्ष) असे कुटुंब होते श्रावण यास दारु पिण्याचे व्यसन होते ३० मार्च २०१९ रोजी रात्री ११ ते २ च्या दरम्यान सिमा हिचेसोबत पती श्रावण याने घरगुती कारणावरुन वाद केला. त्याच रात्री पत्नी सिमा झोपल्यावर डोक्यात घरातील कु-हाड मारुन खून केला व पलायन केले. याबाबत मयत सिमा हिचे बंधु भारत गायकवाड यांनी निफाड पोलिस स्टेशनला फिर्याद नोंदविली. त्यानंतर भादवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदवुन श्रावण किसन गायकवाड यास अटक केली.
तपास अधिकारी विष्णु गायकवाड यांनी श्रावण गायकवाड याचेविरुध्द तपास करुन आरोपपत्र निफाड न्यायालयात दाखल केले सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकिल अँड रमेश कापसे यांनी तपास अधिकारी यांचेसह एकुण ९ महत्वपूर्ण साक्षीदारांची साक्ष नोंदविली व युक्तिवाद केला न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुराव्यावरुन आरोपी श्रावण किसन गायकवाड यास दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड ,दंड न भरल्यास दहा वर्ष कारावास अशी शिक्षा निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी यांनी सुनावली आहे